कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज बुधवारी भाजपात प्रवेश करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी अखेर आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठवला असून,बुधवारी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बुधवारी कालिदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक,आमदार वैभव पिचड आणि चित्रा वाघ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
वडाळा विधानसभा संघाचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी अखेर आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठवला आहे. आमदार कालीदास कोळंबकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला.कोळंबकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. तशी त्यांनी जाहीर वाच्यताही केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचारही त्यांनी केला होता.
बुधवारी ३१ जुलै रोजी कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नक्की मानले जात आहे.कोळंबकर यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक,नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक, अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेल्या चित्रा वाघ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे समजते.