निर्मला गावीत आणि रश्मी बागल यांनी बांधले शिवबंधन

निर्मला गावीत आणि रश्मी बागल यांनी बांधले शिवबंधन

मुंबई नगरी टीम

मुंबई :  इगतपुरीच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत आणि करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.गावीत आणि बागल यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पुरामुळे रखडलेले पक्ष प्रवेश पुन्हा एकदा सुरू झाले असून, आचारसंहितेला काही दिवस बाकी असतानाच पक्ष बदलास सुरूवात झाली आहे. कालच आमदारकीचा राजीनामा दिलेल्या इगतपुरीच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्रातील करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला.बागल आणि गावीत यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रावादीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. इगतपुरीच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर माजी राज्यमंत्री दिवंगत दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रवेश करीत असल्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपाची युती असून, आमचे ठरले आहे त्यानुसार सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभेत युती किती जागा जिंकेल या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, मी अंदाज वगैरे लावत नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचारा प्रमाणे जिंकायचे म्हणजे जिंकायचे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने बजावलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की,या चौकशीतून काही निघेल असे मला वाटत नाही.

Previous articleआदिवासी विभागातील फर्निचर घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा
Next articleराज ठाकरेंचे आवाहन : कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका