भाजपने शिवरायांच्या नावावर मते मागून त्यांचेच गड-किल्ले विकायला काढले!
मुंबई नगरी टीम
मुंबई : निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागून भारतीय जनता पक्षाने आता त्यांचेच गड-किल्ले खासगी हॉटेल व्यावसायिकांना विकण्याचा घाट घातल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी भाजप-शिवसेना सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान असलेल्या गड-किल्ल्यांचे जतन झाले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण म्हणून हे किल्ले हॉटेलमध्ये परिवर्तित करणे म्हणजे ते विकायला काढल्यासारखेच आहे. राज्य सरकारचे हे धोरण संतापजनक आहे. हे गड-किल्ले भाडेपट्टीवर दिल्यानंतर तिथे भटकंती करण्याचा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. किल्ल्यांवर येणाऱ्या गडप्रेमींकडून माफक प्रवेश शुल्क आकारून त्या निधीतून संबंधित किल्ल्यांचे जतन करण्याची भूमिका यापूर्वीच्या सरकारने घेतली होती व ते योग्य आहे. मात्र संवर्धन करण्यासाठी व पर्यटन वाढवण्यासाठी हे किल्ले खासगी ह़ॉटेल व्यावसायिकांकडेच दिले पाहिजे, हा अट्टाहास चुकीचा आहे. ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे अनेक चांगल्या स्थळांवरील हॉटेल्स व रिसॉर्ट आहेत. ते त्यांनी अगोदर योग्य पद्धतीने चालवून दाखवावेत आणि नंतर किल्ल्यांचा विचार करावा, असा टोला हाणून अशोक चव्हाण यांनी हे धोरण रद्द करण्याची मागणी केली आहे.