हर्षवर्धन पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई नगरी टीम
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना थोपविण्याचे अनेक प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते.
काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे घेतलेल्या मेळाव्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर भेट घेवून सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी विमानाने पुण्याला जाण्यासाठी दुपारच्या सुमारास मुंबई विमानतळावर पोहचताच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली. या दोन्ही नेत्यामधिल चर्चेचा तपशील हाती लागला नाही मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांना पाटील यांनी मदत केली होती.. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातील ७० हजारांचे मताधिक्य मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेसचाही मोठा वाटा होता. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मधून विधानसभेची उमेदवारी देणाच्या शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे नाराज झालेले पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. २०१४ चा अपवाद वगळता इंदापूर तालुक्यावर काँग्रेसची सत्ता ठेवण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी ठरले आहे.