पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत

मुंबई नगरी टीम

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी मुंबईच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर येत असून ते या दौऱ्यात ते मुंबईत तसेच औरंगाबादमध्ये जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.नागपूरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते मात्र नागपूर  मेट्रोला सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने ऐनवेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

पंतप्रधान मोदी यांचे उद्या सकाळी मुंबईत आगमन होईल त्यानंतर त्यांच्या हस्ते बांद्रा-कुर्ला संकुलात मेट्रोच्या १० (गायमुख ते मीरा रोड शिवाजी चौक), ११ (वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस) आणि १२ (कल्याण ते तळोजा) प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. हे तीनही मेट्रो मार्ग ४२ किलोमीटरचे आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते मेट्रोभवनचा पायाभरणी समारंभ होईल. या मेट्रोभवनमधून ३४० किलोमीटरच्या १४ मेट्रो मार्गांचे परिचालन केले जाईल. ३२ मजल्यांची ही इमारत असेल. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते कांदिवली पूर्वेतील बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन होईल. मेट्रोच्या भारतीय बनावटीच्या पहिल्या डब्याचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते महा मुंबई मेट्रोच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन होईल. मुंबईत त्यांची बीकेसीच्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये जाहीर सभाही होईल.आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्या दौ-याच्या निमित्ताने भाजपा मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

मुंबई दौ-यांनतर पंतप्रधान मोदी हे औरंगाबादला रवाना होतील. तेथे ते महिलांच्या स्वयंसहाय्यिता गटांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला संबोधित करतील. उमेद, या संस्थेतर्फे या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान पुढे नागपूरलाही रवाना होणार होते. नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाचाही त्यांचा कार्यक्रम होता. परंतु, या मेट्रोला अजूनही सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने ऐनवेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच नाना पटोले यांनी या प्रमाणपत्राचा विषय उपस्थित केला होता.

Previous articleहर्षवर्धन पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Next articleअनुसूचित जमातीच्या १३ योजना धनगर समाजाला  लागू