काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आल्यास शेतक-यांना सरसकट कर्जमाफी
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचा शपथनामा आज जाहीर करण्यात आला असून, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आल्यास पहिल्या चार महिन्याच्या कालावधीत राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.शपथनाम्यात बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्याच्या आश्वासनबरोबरच सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या महत्वाच्या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचा संयुक्त शपथनामा जाहीर करण्यात आला.या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीचे सरकार आल्यास पहिल्या चार महिन्यातच राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन या शपथपत्रात देण्यात आले आहे.त्याच बरोबर राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केजी टू पीजी मोफत शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.या शपथपत्रात राज्यातील कामगारांना केंद्रस्थानी ठेवत कामगारांचे किमान वेतन २१ हजार रूपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.शहरी भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत घर असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले आहे.शाळा, महाविद्यालये,रूग्णालये, रेल्वे स्थानक,बसस्थानक परिसरात वायफाय अनिवार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आणि शाश्वत विकासाच्या दिशेने जाण्याचा निर्धार करणाऱ्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडी आघाडी वचनबद्ध आहे, असे यावेळी दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी यावेळी सांगितले.आजचे शपथपत्र जाहीर करून विधानसभा निवडणूकीला सामोरे जात असून, राज्यातील जनतेने या शपथनाम्याचे स्वागत करावे आणि आमच्या पाठिमागे उभे रहावे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे.राज्याची अर्थव्यवस्था घसरणीला जावून प्रगतीचा वेग मंदावून महाराष्ट्रातील उत्पन्नात घट झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.