मुख्यमंत्री म्हणतात… नितेश राणेंना ७० टक्के मते मिळतील

मुख्यमंत्री म्हणतात… नितेश राणेंना ७० टक्के मते मिळतील

मुंबई नगरी टीम

कणकवली : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज आपला पक्ष भाजपमध्ये विलिन केला. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असे नारायण राणे यांनी यावेळी जाहीर केले. कणकवलीत ६५ ते ७० टक्के मते नितेश राणे यांना मिळतील असे सांगत,कोकणाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रीत करू. तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय फुलविण्यासाठी सी वर्ल्डचे काम येत्या दोन वर्षांत सुरू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले

नितेश राणे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. कोकणाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रीत करू. तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय फुलविण्यासाठी सी वर्ल्डचे काम येत्या दोन वर्षांत सुरू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री कणकवलीत झालेल्या सभेत बोलत होते. या वेळी नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला राहुल गांधी यांची मदतच होईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.खासदार नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे उपस्थित होते.

नितेश राणे हे राणे साहेबांच्या शाळेत होते, त्यामुळे आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नितेश राणे यांनी कोकणाचे, सिंधुदुर्गाचे प्रश्न विधानसभेत आक्रमकतेने मांडले. पण आता त्यांना आमच्या शाळेतला संयम शिकवायचा आहे. आवश्यक तेथे आक्रमकता आणि आवश्यक तेथे संयम अशा मार्गाने कोकणाचे प्रश्न सोडवायचे आहेत.मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही निवडणूक आपण शांतपणे लढवली पाहिजे. प्रेमाने लढवली पाहिजे. मला खात्री आहे, कणकवलीत ६५ ते ७० टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. चिथावणी देणाऱ्यांकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. जिंकणाऱ्यांनी मोठ्या मनाने वागायचे असते.’

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबई-गोवा महामार्ग हा पर्यटन वाहिनी असणार आहे. महायुती सरकारने कोकणातल्या पहिल्या फाइव्ह स्टार हॉटेलसाठी सिंधुदुर्गात जागा दिली. चिपी विमानतळावरून नियमित सेवा लवकरच सुरू होईल. आम्ही मागच्या ५ वर्षांत सी वर्ल्ड करू शकलो नाही, ही खंत आहे. राणे साहेबांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. येत्या दोन वर्षांत सी वर्ल्डचे काम सुरू करू. हे पर्यटनाचे मॅग्नेट आहे. राणे साहेबांचे डबल इंजिन आता आमच्यासोबत आले आहे.’आपले मंत्रिमंडळ पुन्हा स्थापन झाले की मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेऊन जिल्ह्यातील सर्व गोष्टी मार्गी लावू. कोकणाला येत्या पाच वर्षांत टॅंकरमुक्त करू. पिण्याचे पाणी देऊ. पायाभूत सुविधांमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक करू. १ कोटी युवकांना रोजगार देऊ. याचा मोठा वाटा सिंधुदुर्गाचा असेल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

Previous articleसंकल्प पत्र नाही हे तर भाजपचे अपयशपत्र
Next articleराज्याचं पुन्हा वाटोळं करण्यासाठी तुम्हाला सत्ता द्यायची का