शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं २४ तास खुली

शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं २४ तास खुली

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा  भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर केला आहे. शिवसेनेकडून प्रस्ताव लवकरात लवकर येईल. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दार २४ तास खुली आहेत असेही पाटील यावेळी म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित होते.महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष  शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट जनादेश दिला आहे.या जनादेशाचा आदर करुन आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.तो प्रस्ताव शिवसेनेकडून लवकरात लवकर येईल. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दार २४ तास खुली आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतत्वाखाली स्थापन होणाऱ्या या सरकारसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही मान्यता मिळाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी देवेंद्रजी फडणवीस यांची एकमताने निवड केली आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल असा दावा पाटील यांनी केला.

Previous articleदेवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री
Next articleयुतीमध्ये जे ठरलंय ते लेखी द्यावं :संजय राऊत