शिवसेनेशी काही मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेणार

शिवसेनेशी काही मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये राष्ट्रवादी आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला सत्तेत बरोबर घेण्यासंदर्भातील मुद्यावर चर्चा करण्यात आली.अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा करण्यात येवून नंतर किमान समान कार्यक्रम ठरविण्यात येईल, त्यानंतरच शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढील निर्णय घेवू अशी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी लवकरच नवीन सत्ता समिकरणे अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी राज्यात नवे सरकार येण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,के.सी. वेणुगोपाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील नेतेही उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर केली.राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेने आमच्याशी संपर्क केला  आहे. त्यामुळे आम्ही आज चर्चा करण्यासाठी येथे आलो असले तरी  शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही असे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी स्पष्ट केले.अगोदर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा करण्यात येईल. नंतर किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.आजच्या बैठकीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा कोणताही निर्णय न झाल्याने राज्यात नवे सरकार येण्यासाठी अजून काही दिवसाची वाट पहावी लागणार आहे.

राज्यपालांनी राष्ट्रवादीला दिलेली अपुरी असल्याची चर्चा असतानाच,राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे,त्यामुळे आम्ही निवांतपणे निर्णय घेऊ,असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तिन्ही पक्षांशी चर्चा करुन किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल. राज्यातील नवे सरकार आले तर ते कसे चालेल हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. सरकार बनवायचे आहे की नाही, बनवायचे असेल तर कोणत्या मुद्यांवर सरकार स्थापन करायचे याची प्रथम चर्चा केली जाईल असे पवार यांनी सांगितले.आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानंतर या निर्णयावर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी टीकास्त्र सोडले. या सरकारने गोवा, उत्तराखंड या राज्यात मनमानी कारभार केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे ही लोकशाहीची थट्टा आहे असे सांगत, पटेल यांनी याचा निषेध केला. राज्यपालांनी मोठा पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले, मात्र काँग्रेसला निमंत्रण दिले नाही हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट करून शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे सांगून, पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवू, असे अहमद पटेल यांनी सांगितले.

Previous articleराज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
Next articleराज्याचे राजकारण वेगळ्या दिशेला जात असेल तर विचार केला पाहिजे