म्हणून… वर्षावर देवेंद्र फडणवीसांचा अजून काही दिवस मुक्काम
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेशी बिनसल्याने दुस-यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंग झाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयासह मंत्री राज्यमंत्र्यांच्या दालनात आवराआवर सुरू झाली असली तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षावरील मुक्काम कायम आहे. सध्या फडणवीस यांना वर्षावरील मुक्कामास तीन महिन्याचा अवधी मिळाला असला तरी राज्यात नवे सरकार स्थापन होताच त्यांना वर्षावरील मुक्कम हालवावा लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर राज्यात भाजपा शिवसेनेती सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार अशी चर्चा होती. मात्र सत्ता वाटप समसमान होवून मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळावे अशी मागणी शिवसेनेनी केल्याने दुस-यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे स्वप्न भंग पावले. राज्यात सत्ता पेच कायम राहिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त झाले.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री, मंत्री,राज्यमंत्री कार्यालयातील साहित्य आणि दालनांचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढले आहेत.त्यानुसार सर्वच मंत्र्यांच्या कार्यालयातील सामानाची आवराआवर करण्यात आली. सत्ता जाताच मुख्यमंत्री मंत्र्यांना आपले बंगले खाली करावे लागतात.माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान सोडले किंवा नाही याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम वर्षावरच असणार आहे.शासकीय नियमानुसार कोणत्याही मंत्र्याला बंगले खाली करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मिळतो. मात्र राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यास त्यांना वर्षावरील मुक्काम हलवावा लागणार आहे.