सत्ता गेल्यानंतर भाजपा आक्रमक ; राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन

सत्ता गेल्यानंतर भाजपा आक्रमक ; राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन

मुंबई  नगरी टीम

मुंबई : गेली पाच वर्षे राज्याच्या सत्तेत असणा-या भाजपाने आज रस्त्यावर उतरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जनतेला सत्य कळले आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.

राफेल प्रकरणीच्या सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत, राहुल गांधींना माफी मागायला लावली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल करणे, आणि पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची बदनामी केल्याबद्दल संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येत आहे. याअंतर्गत दादर येथील वसंत स्मृती येथे महाराष्ट्र भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होऊन, त्यांनी राहुल गांधींविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.स्वत:च्या स्वार्थासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो हे संपूर्ण देश पाहात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप करुन, जनतेची दिशाभूल केली. या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दूध का दूध पानी का पानी होऊन, जनतेला खरं काय समजलं आहे. राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल केल्यामुळे देशातल्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी केली.

विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपाचे बिनसले आणि दुस-यांदा सत्तेत येण्याचे भाजपाचे स्वप्न भंग  झाले. त्याच वेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवे समीकरण उदयाला येत असल्याने आता भाजपा नेते आक्रमक झाल्याचे चित्र आहे. गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला आज रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले .

Previous articleमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू  
Next articleम्हणून… वर्षावर देवेंद्र फडणवीसांचा अजून काही दिवस मुक्काम