काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड
मुंबई नगरी टीम
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आ. बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आल्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत केली.
काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, बस्वराज पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, आ, के. सी. पडवी, आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, आ. सतेज पाटील, खा. बाळू धानोरकर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे नेते आ. शरद रणपिसे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व नवविर्वाचित आमदार उपस्थित होते.
२३ नोव्हेंबर रोजी माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवास्थानी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता व अन्य पदाधिकारी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता.
आज दुपारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आ. बाळासाहेब थोरात यांची निवड केली. विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करून पुन्हा एक मोठी जबाबदारी दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे तसेच काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांचे आभार मानले, आणि आपण सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यरत राहू असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.