मुंबई नगरी टीम
मुंबई : अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला.राज्यात बळीराजाची अवस्था बिकट झालेली आहे.महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.असे असताना शेतकऱ्यांना न्याय देण्यास आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारचा पर्दाफाश करणार असल्याची ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर आणि भारतीय जनता पक्षाच्या इतर सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाहीर निषेध दर्शिविला.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असे सांगून ठाकरे सरकारने त्यांची घोर फसवणूक केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास व त्यांच्या विविध हक्कांसाठी लढण्यास असमर्थ ठरले आहे .राज्यात महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्यातील महिला असुरक्षित आहे. महिलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. हे आणि जनतेचे विविध प्रश्न दोन्ही सभागृहांमध्ये ताकदीने मांडणार व ठाकरे सरकारचा पर्दाफाश करणार असल्याची प्रखर भूमिका दरेकर यांनी मांडली आहे.