दीड हजार ग्रामपंचायतींसाठी येत्या २९ मार्चला मतदान

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान; तर ३० मार्च २०२० रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १८ मार्च २०२० पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान २९ मार्च २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- १३, रायगड- १, रत्नागिरी- ८, नाशिक- १०२, जळगाव- २, अहमनगर- २, नंदुरबार- ३८, पुणे- ६, सातारा- २, कोल्हापूर- ४, औरंगाबाद- ७, नांदेड- १००, अमरावती- ५२६, अकोला- १, यवतमाळ- ४६१, बुलडाणा- १, नागपूर- १, वर्धा- ३ आणि गडचिरोली- २९६. एकूण- १५७०

Previous articleकर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!
Next articleअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक