आता सेवानिवृत्त पोलिसांनाही मिळणार वैद्यकीय सुविधेचा लाभ

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सेवानिवृत्तीनंतर या पोलिस कर्मचा-यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. या प्रश्नाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत सेवानिवृत्त झालेल्या हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलिसांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळण्याबाबत सरकारचा विचार आहे, त्यामुळे सेवानिवृत्त पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने या सेवानिवृत्त पोलिसांचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्याचा सरकारचा मानस आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

पोलिसांसाठी लागू करण्यात आलेल्या आरोग्य योजनेतंर्गत विनामूल्य वैदयकीय सुविधा मिळण्याबाबची उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनावर प्रश्न उपस्थित करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, पोलिस अधिकारी, हवालदार सेवेत असताना त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येते, पण निवृत्तीनंतर मात्र पोलिसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. यासंदर्भात सेवानिवृत्त पोलिस संघटनेसोबत मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्याचप्रमाणे खासगी व विश्वस्त संस्थेच्या रुग्णालयात पोलिसांसाठी खाटा राखीव असतात का व आतापर्यंत या सुविधेचा लाभ किती पोलिसांना मिळाला याची माहिती सरकारने द्यावी असे दरेकर यांनी नमूद केले.

गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, राज्यात अनेक विश्वस्त संस्थांची रुग्णालये आहेत. या रुग्णालयांना विविध प्रकारच्या शासकीय सुविधा मिळत असतात पण येथे पोलिसांना वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. या रुग्णालयांमध्ये दारिद्रय रेषेखालील रुग्णांना शासकीय नियमानुसार या लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु काही खासगी रुग्णालये याकडे दुर्लक्ष करतात. परंतु यासंदर्भात आरोग्य विभागाशी चर्चा करुन पोलिसांना अशा खासगी रुग्णालयाकडून वैदयकीय सुविधेचा लाभ मिळण्यासंदर्भात कडक उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावरील असलेला ताण लक्षात घेता, त्या पोलिसांची स्ट्रेस चाचणी, इको कार्डियोग्राम चाचणीही करण्यात येईल असेही गृहमंत्री देशमुख यांनी यासंदर्भात उत्तर देताना स्पष्ट केले. तसेच राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी,कर्मचाऱ्यांच्या वार्षिक १२ वैद्यकीय चाचण्या केल्या जातील त्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपयांची तरतूद केली जाईल, अशी माहितीही गृहमंत्री देशमुख दिली.

Previous articleशिवसेनेने प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी दिल्याने चंद्रकांत खैरे नाराज ?
Next articleदहशतवादी संघटनेकडून मुंबई बाग आंदोलनाला फंडिग: दरेकरांचा गौप्यस्फोट