मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लोकलमध्ये गर्दी करू नका असे आवाहन करुनही अनावश्यक प्रवास सुरु राहिल्याने अखेर सरकारला गर्दी टाळण्यासाठी लोकल प्रवासावर आजपासून निर्बंध लादावे लागले आहेत.अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय आवश्यकता असणा-या व्यक्तींनाच लोकल प्रवास करु दिला जाणार आहे.
लोकल प्रवासावर आजपासून निर्बंध लादण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती रात्री उशिरा दिली. राज्यातील कोरोना रूग्णांची दररोज वाढणारी संख्या लक्षात घेता. अनावश्यक लोकल मधील गर्दी कमी करा अन्यथा नाईलाजाने रेल्वे बंद करावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवूनही खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून ते ३१ मार्च पर्यंत लोकल प्रवासावर निर्बंध लागू केले आहेत.अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि तात्काळ वैद्यकीय सेवेची गरज असणा-या व्यक्तींना त्यांचे ओळखपत्र दाखवून प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. अन्य प्रवाशांना या कालावधीत प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची खातरजमा करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
आजपासून मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांवर पोलीस पथके तैनात केली जाणार आहेत.एक रेल्वे पोलीस, एक राज्य सेवेतील पोलीस,महसूल अधिकारी आणि वैद्यकीय प्रतिनिधींचा या पथकात समावेश असणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्यात येणार आहे.लांब पल्ल्याच्या रेल्वेने बाहेर गावी जाणा-या प्रवाशांकडे असणा-या तिकिटाची तपासणी करुन त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. आजपासून ३५ टक्के लोकल सेवा कमी करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणा-या प्रत्येक आहे व्यक्तींची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणी व्यक्ती प्रतिकूल आढळल्यास त्याला लगेच अलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.