पोलिसांना कोरोना होत नाही काय ? प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : पोलीसांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकार किती संवेदनशील आहे याचा पुरावाच माझ्याकडे आला आहे,पोलिसांच्या वाहतूकीसाठी गृहखात्यातर्फे केलेल्या व्यवस्था या जीवघेण्या असून, पोलिसांना कोरोना होत नाही का?   असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारला विचारला आहे.

प्राणाची बाजी लावून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या पोलिसांचा जीव गृहखात्याने धोक्यात टाकला आहे. सर्वांसाठी सामाजिक अंतर म्हणजेच सोशल डिस्टन्स राखण्याचे बंधनकारक केलेले असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांची मात्र अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. पोलिसांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याशी हा खेळच आहे.

कोरोना व्हायरस या अतिशय नविन आरोग्य संकटांशी कुठलाही पूर्वानुभव नसताना राज्याचे पोलीस दल लढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या आपल्याकडे घरी बसणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हेच दोन उपाय आहेत. अशा वेळी राज्याचे पोलीस दल अपुऱ्या साधनांनिशी रस्त्यावर पहारा देत आहे. मात्र, गृहखात्यातर्फे पोलिसांना पुरवण्यात आलेली वाहने तोकडी आहेत. एकाच वाहनात क्षमतेपेक्षा जास्त पोलिसांची वाहतूक केली जाते. या पोलिसांना मास्क तसेच ग्लोव्हज् ही देण्यात आलेले नाहीत. कोरोनाशी लढायचं असेल तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट लागतात. मात्र, या कशाचाच पुरवठा पोलिसांना झालेला नाही. मुंबईच्या लगतच्या परिसरातून मोठ्या प्रमांणावर पोलीस मुंबंईत येत असतात, त्यांच्या साठी सोशल डिस्टन्स पाळता येईल इतक्या गाड्या उपलबद्ध केल्या पाहिजेत अशी मागणी प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. पोलिसांची वाहतूक करणाऱ्या गाडीचे फोटो मिळताच प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी करून तात्काळ कारवाईची मागणी केली.

Previous articleकिमान संध्याकाळी तरी दारुची दुकानं उघडी ठेवा !
Next article“कोविड-१९” मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळ हाताने मदत करा