पंतप्रधानांच्या भाषणातून जनतेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा : विरोधकांचे  टिकास्त्र

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला जनतेला संदेश दिला.येत्या रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती,मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांच्या या आवाहनावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टिकास्त्र सोडले आहे.

वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देवून गेले अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावर प्रतिक्रिया देताना  मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.पंतप्रधानांच्या भाषणातून देशवासियांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली आहे असेही मलिक म्हणाले.

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आणखी गंभीर होत चालले असताना अशा कठिण प्रसंगी पंतप्रधानांनी यापूर्वी टाळ्या वाजवायला लावल्या, आता दिवे लावायला सांगत आहेत. असे सांगतनाच पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहे का ? देशाचे प्रमुख म्हणून काही निर्णय घेणार आहे का ? असा सवाल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.कोरोनाच्या परिस्थितीत आज वेद्यकीय साहित्य पुरविणे,राज्यांना जास्तीत जास्त मदत करणे, देशातील जनतेला धीर देणे हे सोडून पंतप्रधान जनतेला दिवे लावायला लावत आहेत, हे पंतप्रधानांचे काम आहे का ? असा सवाल थोरात यांनी उपस्थित करीत निदान कोरोनाच्या विषयात तरी पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवे असे थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये  म्हटले आहे.

भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली आहे,एकाही जनतेला मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.देशातील कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणातून अपेक्षा होती.मात्र त्यांनी सध्याच्या संकटाचाही इव्हेंट करायचे ठरवलं आहे अशी खोचक टिका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका असा टोला त्यांनी लगावला आहे.’मी मुर्ख नाही. मी ‘त्या’ दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही.मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,” असे सांगत आव्हाड यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर कडाडून टिका केली आहे.

दरम्यान,पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ५ एप्रिल रोजी सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपली एकजूट दाखवावी, आणि रात्री ९ वाजता आपल्या घरातील लाईट नऊ मिनिटांसाठी बंद ठेवावेत; आणि दिव्याच्या प्रकाशात भारतमातेचे स्मरण करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांमध्ये एकटेपणाची, नैराश्येची भावना निर्माण झाली.या अंधकारमय वातावरणातून सर्वांना बाहेर काढून, त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सर्वांनी आपापल्या घरातील लाईट नऊ मिनिटांसाठी बंद करावेत,आणि मेणबत्ती, मोबाईलचा फ्लॅश लाईट, टॉर्चच्या प्रकाशात घराच्या बाल्कनीत, मोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करावे. यावेळी कुणीही रस्त्यावर येऊन गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण देशाने एकजुटीचा प्रत्यय जगाला दाखवून दिलेला आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवल्यास आपण कोरोनावर नक्कीच मात करु,असा विश्वासही पाटील यांनी  व्यक्त केला आहे.

Previous articleCoronavirus : मुंबईत एका दिवसात ५७ नविन कोरोना बाधित रुग्ण 
Next articleकिचन सेवेच्या माध्यमातून दररोज ६ हजार जणांना भोजन