जयंतराव…कोरोनाच्या लढाईत काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना कुठे आहे ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : जयंतराव,कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना,कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा,त्याची गरज सगळ्यात जास्त आहे. असा टोला भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांना लगावला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची शिफारस राज्याच्या आघाडी मंत्रिमंडळाने केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील ह्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्षांवर टीकेची झोड उठवली होती. त्या टीकेला प्रतिसाद देताना पाटील ह्यांनी म्हटले आहे की, भाजपाचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ५६० कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. ४३ लाख कुटुंबाना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे. ६.५० लाखांपेक्षा जास्त मास्क आणि ४.७५ लाख सॅनिटायझरचे वाटले केले आहे. पाच हजार युनिट्स रक्त गोळा केले आहे. रक्त ठेवायला जागा नाही असे रक्तपेढ्यांनी सांगितल्यामुळे रक्तदान थांबवून रक्तदात्यांच्या याद्या तयार करायला सुरुवात केली. आज २२ हजार रक्तदात्यांची यादी भाजपा कार्यकर्त्यांकडे तयार आहेत. भाजपाचे सर्व नेते, आमदार, खासदार, सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी स्वत: हे काम करत आहेत. कोरोन विरुद्धची लढाई भाजपा पूर्ण गांभिर्याने लढत आहे. अशी माहिती देऊन चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, ह्या सर्व लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना कुठे आहे ? ह्याची माहिती जयंतराव पाटील ह्यांनी द्यावी.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबद्दल जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांकडे अजून दोन महिने आहेत. हाच ठराव मंत्रिमंडळाने मे जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? आणि ज्या दोन रिक्त जागांचा उल्लेख आपण करत आहात त्यांनी पूर्वीच राजीनामे दिलेत.त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला म्हणून राजीनामे दिलेत, मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीत. असे स्पष्ट करून चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, राजकारण करणे, विरोधकांना आपल्या बंगल्यांवर अपहरण करून आणून मारहाण करणे, आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांच्या मौजमजेची व्यवस्था करणे, आपल्या स्वीय सहायकाला अडवले म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करणे, अधिकाऱ्यांना वेठीला धरून विश्रामगृहांवर पार्ट्या करणे याखेरीज करण्यासारखी असंख्य कामे आहेत. त्याबाबत जयंतराव पाटील यांनी आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे.

Previous articleसावधान : राज्यात कुठेही “ऑनलाइन दारू” विक्रीला परवानगी नाही
Next articleराज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७६१ वर पोहचली