सावधान : राज्यात कुठेही “ऑनलाइन दारू” विक्रीला परवानगी नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात असलेल्या लॅाकडाऊनच्या कालावधीत विविध समाज माध्यामांतून ऑनलाइन दारू विक्रीच्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्याच दारू विक्री परवाना असलेल्यांना अशी ऑनलाइन दारू विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही‌.त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये,असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात असलेल्या लॅाकडाऊनच्या काळात ऑनलाईन वाईन किंवा ऑनलाईन लिकर या मथळ्याखाली घरपोच दारू देण्याची सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे विविध समाज माध्यमांवर फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत.ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे.या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन झालेला आहे. राज्यातील ‌ सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद असून अवैध मद्य निर्मिती,वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर कारवाई सुरू आहे.यासंदर्भात राज्यात काल एकूण १४७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६६ जणांना अटक करण्यात आली आहे.११ वाहने जप्त करण्यात आली असून ३० लाख ४८ हजार किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच २४ मार्च ते १० एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार २८१ गुन्हे नोंदविण्यात आले असून ८९२ जणांना अटक करण्यात आली आहे.१०७ वाहने जप्त करण्यात आली असून  ५.५५ कोटी रुपये  किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३ तर व्हाट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात.तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

Previous articleलॉकडाऊन अधिक कडक करणार; परीक्षांचा निर्णय मंगळवारी घेणार
Next articleजयंतराव…कोरोनाच्या लढाईत काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना कुठे आहे ?