भाजपचा ज्येष्ठ नेत्यांना दे धक्का ;या नव्या चेह-यांना दिली संधी

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवड समितीने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा आज केली असून,प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,अजित गोपछडे,रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे.विधान परिषदेला डावलल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. यासाठी भाजपकडून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,धनगर समाजाचे नेते आणि अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले गोपीचंद पडळकर,नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके आणि भाजपचे कार्यकर्ते अजित गोपछेडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.या निवडणूकीसाठी भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती मात्र या चारही नेत्यांना डावलण्यात आले आहे.यामुळे या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन  पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.या निवडणूकीत डावलल्याने माजी मंत्री खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणे बाकी असले तरी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची चर्चा आहे तर काँग्रेसकडून माजी मंत्री नसिम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपसभापती निलम गो-हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.सध्याचे पक्षीयबलाबल पाहिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येवू शकतो.भाजपने चौथा उमेदवार दिल्याने या निवडणूकीत चूरस निर्माण झाली आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार रिंगणात उतरविल्यास या निवडणूकीत चूरस निर्माण होवू शकते.मुख्यमंत्री ठाकरे हे या निवडणूकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी आणि विरोधांकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

Previous articleराज्यात तीन हजार वाइन शॉप सुरु ; आज ४८ कोटीचा गल्ला
Next articleपक्ष बळकटीसाठी शशिकांत शिंदेंकडे राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्षपद देणार ?