मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ९ जागांसाठी केवळ ९ अर्ज आले असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.त्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी १४ अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यापैकी अपक्ष उमेदवार राठोड शेहबाज अलाउद्दीन यांचा अर्ज बाद ठरला होता. तर भाजपचे डॉ. अजित गोपछडे,संदीप सुरेश लेले, राष्ट्रवादीचे किरण पावसकर शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता त्यामुळे याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राजेश राठोड (काँग्रेस). तर भाजपचे गोपीचंद पडळकर,प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि रमेश कराड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.