मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या आठवड्यात विधानपरिषदेतील तब्बल १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्य निवृत्त होणार आहेत.या रिक्त होणा-या जागेवर संधी मिळावी यासाठी आत्तापासून इच्छूकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी झालेली निवडणूक चांगलीच गाजली असतानाच आता पुढील आठवड्यात राज्यपाल नामनियुक्त १२ विधानपरिषदेतील सदस्यांची मुदत संपत असून,यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.या यादीत काँग्रेसचे ५ राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर घटक पक्षांच्या एका आमदाराचा समावेश आहे.विधान परिषदेत असणारे राज्यपाल नामनियुक्त सदस्य हुस्नबानू खलिफे,जनार्दन चांदूरकर,आनंदराव पाटील,रामहरी रूपनवर हे काँग्रेसचे ४ तर प्रकाश गजभिये,विद्या चव्हाण,राहुल नार्वेकर,ख्वाजा बेग,रामराव वडकुते,जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आमदार येत्या ६ जून रोजी निवृत्त होत आहेत. तर काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे. असे एकूण १२ आमदार निवृत्त होत आहेत.त्यापैकी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर,रामराव वडकुते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्या कारणाने या दोन जागा रिक्त होत्या. या दोन रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती करावी अशी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.मात्र राज्यपालांनी या रिक्त जागेवर नियुक्त्या केल्या नव्हत्या.
कला, क्रीडा विज्ञान आदी क्षेत्राशी संबंधित अथवा यात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्तींची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते. मात्र यापुर्वीचा इतिहास पाहता या नियुक्त्या करताना राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याची उदाहरणे आहेत.त्यामुळे या नियुक्त्यांवरून पुन्हा एकदा राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात तज्ञ व्यक्तींना डावलून राजकीय व्यक्तींची नेमणूक केल्याने तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आक्षेप घेतला होता.तर दुसरीकडे रिक्त होणा-या या जागेवर संधी मिळावी यासाठी आत्तापासून इच्छूकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.