बापरे: राज्यात ९४० पोलीस आणि १५५ पोलीस अधिका-यांना कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटापासून जनतेचे संरक्षण करणारे पोलीस आणि पोलीस अधिकारी या आजाराच्या विळख्यात सापल्याचे चित्र राज्यात आहे.राज्यात सध्या १५५ पोलीस अधिकारी व ९४० पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह  असून त्यांच्यावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्याच्या विविध भागात पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी स्वत: च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत.मात्र जनतेचे संरक्षण करता करता या भयंकर आजाराची बाधा त्यांना झाली आहे.राज्यात सध्या १५५ पोलीस अधिकारी व ९४० पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असून,सध्या विविध रूग्णालयात  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ११ पोलिस व १ अधिकारी असे एकूण  १२, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण २, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व  अशा २० पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला.

 लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. तर कलम १८८ नुसार  १ लाख १५ हजार ७२३ गुन्हे नोंद झाले असून २३ हजार २१७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ५१ लाख ७२हजार ५४५ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ७०० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६ लाख २ हजार ८२२ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.आजपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४,३१,८२७ पास देण्यात आले आहेत.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७२ हजार ७५५ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.राज्यात एकूण १२२६ रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास ७६,०४५  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Previous articleदहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा;भूगोलच्या पेपरचे गुण या पद्धतीने देणार
Next articleपुढील आठवड्यात १२ आमदार निवृत्त होणार