दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा;भूगोलच्या पेपरचे गुण या पद्धतीने देणार

मुंबई नगरी टीम

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-२ म्हणजेच भूगोल व दिव्यांग कार्यशिक्षण या विषयाचे पेपर रद्द करण्यात आले होते. या विषयांना गुण देणेसंदर्भात शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे.याबाबत शिक्षण मंडळाने पत्रक काढले आहे.रद्द करण्यात आलेल्या दोन्ही विषयासाठी गुण देण्यात येवून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २३ मार्च रोजी घेण्यात येणारा  दहावीच्या भूगोल आणि दिव्यांग कार्यशिक्षण या विषयाचे पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले होते,या विषयाला गुण देण्याचा  निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.या विषयांच्या परिक्षेसाठी गुण देण्यात येवून दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे,राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी या पत्रकाद्वारे  कळवले आहे. दहावीच्या भूगोल या विषयाचा पेपर २३ मार्च रोजी घेण्यात येणार होता.यासाठी १७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार होती. मात्र राज्यात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.या रद्द करण्यात आलेल्या पेपरला गुण कसे द्यावे याबाबत शालेय शिक्षण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.भूगोलच्या पेपरला गुण देण्यासंदर्भातील विविध पर्यायांचा एक अहवाल मंडळाने मंत्रालयाला सादर केला होता.

सामाजिक शास्त्र पेपर-२ म्हणजेच भूगोल या विषयाचे गुण हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रुपांतर परीक्षा रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुण हे त्याने अन्य विषयांच्या लेखी,तोंडी,प्रात्यक्षिक,अंतर्गत मूल्यमापन परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये किती गुण मिळतात त्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर  इतर कोणताही शेरा नसेल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.या विषयांच्या परिक्षेसाठी गुण देण्यात येवून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्य मंडळाने पत्रकात म्हटले आहे.

Previous articleमहाराष्ट्राची फजिती व्हावी,तारांबळ उडावी म्हणून पियुष गोयल यांनी रेल्वे गाड्या पाठविल्या
Next articleबापरे: राज्यात ९४० पोलीस आणि १५५ पोलीस अधिका-यांना कोरोनाची लागण