मुंबई नगरी टीम
मुंबई ( अरविंद भानुशाली ) : कोरोनाच्या संकटामुळे राज्यात,विशेषतः शहरी विभागातील बांधकाम व्यवसाय धोक्यात आला आहे.गेल्या अडीच महिन्यांत इमारती बांधण्याचे काम ठप्प असून, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने केवळ दोन टक्के फ्लॅटची विक्री झाली आहे.या उद्योग वाढीसाठी केंद्र व राज्य सरकाराने आर्थिक मदत करावी अशी मागणी बिल्डर असोसिएशनने केली आहे.कोरोनाचा सर्वांत मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे.या व्यवसायावर मोठे नियंत्रण आले असून, केवळ अडीच महिन्यात फोर्ड, फियाट,टाटा या कंपन्यांच्या गाड्यांची विक्री केवळ दोन टक्के झाली असल्याचे व्हेईकल डिलर्स असोशिएशनने म्हटले आहे.
मुंबई एमएमआरडी क्षेत्राबरोबर पुणे पीएमआरडी क्षेत्रात हजारो इमारतींची बांधकामे मजुरांमुळे थांबली आहेत.या सर्व उत्तुंग इमारतींवर राज्यातील मजूर काम करू शकत नाही.यासाठी झारखंड,बिहार मधील मजूरच उपयोगी पडतात.कोरोनाच्या भीतीने या क्षेत्रातील ९५ टक्के मजूर आपल्या राज्यात परत गेले आहेत. काही मोठ्या बिल्डरांनी १५-२० दिवस अन्नक्षेत्र लावून त्यांना रोखण्याचा प्रारंभी प्रयत्न केला मात्र त्यांनंतर या मजुरात व त्यांच्या कुटुंबात घालमेल सुरु झाल्याने,आहे तो संसार एका दोन बॅगात भरून पायपीट करीत त्यांच्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परप्रांतिय मजूरांना थोपवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो फोल ठरला आहे.याबाबत हिरानंदानी समूहाचे मालक निरंजन हिरानंदानी म्हणाले,आम्ही पवई, ठाणे व इतर या मजुरांसाठी कॅम्पही उघडले, परंतु काही उपयोग झाला नाही. तर रुणवाल ग्रुपचे सुभाष रुणवाल म्हणाले, ‘आम्ही मुलुंड, ठाणे इत्यादी ठिकाणी जेथे बांधकामे सुरु आहेत तेथे निवारा केंद्रेही प्रारंभी सुरु केली परंतु ठेकेदारांच्या हातावर तुरी देऊन हे मजूर पळून गेले. त्यामुळे आमचे नवीन प्रकल्प किमान सहा महिने ते वर्षभर रखडणार आहेत असे रुणवाल म्हणाले.
या परिस्थितीत इमारतीमधील फ्लॅट ६० ते ७० टक्के पडून आहेत,ग्राहकही नाहीत त्यामुळे हजारो कोटींची केलेली गुंतवणूक अडकून पडली आहे.’लोढा’ ग्रुपचे मंगलभाई लोढा व त्यांच्या चिरंजीवांचे म्हणणे आहे ‘या उद्योगात आमचे सुमारे पाच हजार कोटी रुपये अडकले आहेत,या शहरांबरोबर शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी विशेषतः मुंबई पुण्यापासून ७० ते ७५ किलोमीटर अंतरावर शेकडो टाउनशिप पंतप्रधान दिवस योजनेअंतर्गत पडून आहेत. समोर कमी पैशात हि ग्राहक नाही. शहापूर पासून धसई येथे कर्म बिल्डरने ५ हजार इमारतींचे टाउनशिप उभे केले आहे. परंतु ग्राहकच नाही. केवळ ७ लाख ते १२ लाखांपर्यंतची घरे घेण्यास पुढे येत नसल्याने या ५ हजार इमारतीत कुठे दोन चार जण राहण्यास आल्याचे दिसत आहे.आठगाव रेल्वे स्टेशन बाहेर टाउनशिप उभी आहे.एवढेच कशाला पनवेल जवळील पळस्पे फाट्याजवळ १०० एकरात पॅराडाईज टाउनशिप उभी केली आहे. प्रारंभी २० ते २५ टक्के ब्लॉक विकले गेले. आता गेली चार महिने ७० तो ७५ टक्के ब्लॉक बांधून रेडी होऊन विशेषतः ओसी मिळूनही पडून आहेत’ असे या प्रोजेक्टचे विजय पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही मोठ्या टाउनशिप मध्ये मंत्र्यांचे, माजी मंत्र्यांचे,राजकारण्यांचे हजारो रुपये अडकले आहेत.
वाहन उद्योगांवरही अशीच संक्रात आली आहे.गेल्या चार महिन्यात डीलरकडे आपला मोटार गाड्यांचा कोटा पडून आहे. गेल्या अडीच तीन महिन्यात तर डिलरने आपले शोरूम उघडलेच नाहीत. मोटर धंद्यात परदेशी गुंतवणूक १५०० ते २००० कोटींची महाराष्ट्रात आहे. चकण, औरंगाबाद मधील स्कोडा, नागपूर मधील बुटी बोरी, पुणे इत्यादी एमआयडीसी व इतर खाजगी क्षेत्रात मोटारींचे हजारो सांगाडे पडून आहेत. वाहन उद्योगांकडून राज्यसरकारला दरवर्षी साडेचार ते पंचहजार कोटी टॅक्स रूपाने मिळत आहे. चार चाकी वाहने स्कुटर मोटरसायकल त्याचबरोबर जड वाहने डंपर बंद पडून आहेत. तर काही कंपन्यांत या मोटर गाड्यांचे केवळ स्पेअर पार्ट बनवले जाते. त्या कंपन्यांनाही टाळे लागले आहेत. आता राज्यात उद्योग विभागाने उद्योगांना परवानगी दिली आहे. परंतु ती अटी घालून.त्यामुळे अनेक कारखान्यांचे केवळ टाळे उघडले आहेत. पाच ते पंचवीस कामगार आणून कंपनीत ठेवले आहेत. उत्पादन व विक्री नाही अशी अवस्था असल्याचे मोटर उद्योगपती ज्यांचे मोठे नाव आहे त्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे इगतपुरी येथील सीईओ सुरेंद्र यादव यांनी सांगितले.