मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या तीन महिन्यापासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या राजभनवात जावून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुमख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्याचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती झाल्यापासून राज्याचे राजभवन चांगलेच चर्चेत आहे.त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीवरून राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले होते.त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची विनंती केली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्यात राज्य सरकार विरूद्ध राज्यपाल असा सामना रंगल्याची चर्चा होती.त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि काही वेळ राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. मात्र ही कसलीही राजकीय भेट नव्हती तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भेट घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख,खासदार सुनिल तटकरे यांनी भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेक राजकीय किस्से सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हसू आवरले नाही.