लाखो रुपयांची बिले आकारणा-या खासगी रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील विविध खासगी रुग्णालयांकडून कोरोनोच्या रुग्णांची लयलूट सुरु असुन त्यांना विनाकारण लाखोंची बिले आकारली जात आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन रुग्णांना वेठीस धरणा-या खासगी रुग्णायांवर तातडीने कारवाई करावी व कोरोनाच्या रुग्णांवर वेळेत योग्य उपचार होतील याची दक्षता घ्यावी अश्या सूचना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आणि पावसाळयातील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांसमवेत कांदिवली पश्चिम येथे महानगर पालिका परिमंडळ- ७ चे उप-आयुक्त शंकरवार यांच्या दालनात विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पालिकेच्या अधिका-यांनी दरेकर यांना पालिका परिमंडळामधील कोरोनाच्या सद्य स्थितीची माहिती दिली. तसेच कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या सध्याच्या उपाययोजनांचीही माहिती दिली.

यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, खाजगी रुग्णालयांवर महापालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. कोरोनाच्या प्रत्येक रुग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यात येतील अशी भूमिका राज्य सरकार घेत आहे. तर दुसरीकडे मात्र खाजगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून एक लाखा पासून १५ लाखापर्यंतची बिले आकारात आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची लूट करित आहेत. यावर दुर्दैवाने महापालिका यंत्रणेचे कुठेही नियंत्रण दिसत नाही. पश्चिम उपनगरात ही परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे ही अवाजवी लूट महापालिकेने तात्काळ रोखावी तसेच रुग्णांकडून अवास्तव बिले आकारणा-या खाजगी रुग्णालयांवर तातडीने कारवाई करण्याची सूचना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दिल्या.

महापालिकेकेडे आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे व रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी जावे लागत आहे हे गंभीर असल्याचेही दरेकर यांनी नमुद केले.यावेळी या कार्यालयात तयार केलेल्या कोविड नियंत्रण केंद्राचीही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पाहणी केली व  तेथील नियोजनाचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पूर्वी पोयसर- दहिसर नदीची सफाई  तसेच छोटे नाले व मोठे नाले यांची सफाई, त्याचप्रमाणे ज्या भागात पाणी तुंबत आहे, त्यासंदर्भातला आढावा पालिका अधिका-यांकडून  घेतला.  पावसाळ्यापूर्वीची कामांची दखल शीघ्र गतीने घ्यावी अशा सूचना प्रविण दरेकर यांनी दिल्या.

या बैठकीला आर उत्तर विभागाचे पालिका आयुक्त संध्या नांदेडकर, आर मध्य विभागाचे पालिका आयुक्त कापसे, आर दक्षिण विभागाचे पालिका आयुक्त संजय कु-हाडे, विभागीय वैदयकीय अधिकारी डॉ. मदन तसेच प्रत्येक विभागाचे वैदयकीय अधिकारी, मध्यवर्ती यंत्रणेचे कार्यकारी अभियंता एसडब्ल्यूडी,सहाय्यक अभियंता(परिरक्षण), भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, प्रभाग समिती अध्यक्षा प्रितम पंडागळे, नगरसेविका आसावरी पाटील, नगरसेविका सुनिता यादव, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

चिनसोबत होणारे करार तात्काळ रद्द करा

भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मागील वीस वर्षात भारतामध्ये अनेक चिनी कंपन्या आल्या त्यांनी भारतामध्ये कामे देखील केली. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. या परिस्थितीमध्ये मागील ४० दिवसांपासून सातत्यानं चीनशी संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी आपल्या सैनिकांचे बलिदान होत होतं त्याच दिवशी दोन चिनी कंपन्यांना रेड कार्पेट टाकून करार केले जातात आणि जमिनी दिल्या जातात हे योग्य नाही. हे करार तात्काळ रद्द केले गेले पाहिजेत. जोपर्यंत चीन वठणीवर येत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत कोणतेही व्यवहार करण्यात येऊ नये अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Previous articleचीनला धडा शिकविण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार टाका   
Next articleपूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घ्या