मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.कोरोनासंदर्भात राज्यात जे काम सुरू आहे त्याबद्दल केंद्रीय पथकाने कौतुक केले आहे. मुंबईतील यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र लढाई अजून संपलेली नाही.कोरोना रुग्ण अजुनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉईड दिले जात आहे. त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात आणि त्यानुसारच उपचारात त्याचा वापर केला जावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहे. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या कोरोना उपचार केंद्रांवर वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. ट्रेकींग आणि टेस्टींग वाढविण्यात यावे आणि संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा देखील वाढवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बाधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे होऊ नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्यावे. भूमिगत कामांच्या ठिकाणी देखील पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा, असे त्यांनी सांगितले.महापालिकेने एमएमआरडीए, रेल्वे, बीपीटी, मेट्रो, एअरपोर्ट ॲथोरटी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक आयोजित करून सर्व कामांना गती द्यावी. रस्त्यांच्या खड्ड्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावे. रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम केले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मादानासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.