मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा,रयत क्रांती,रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, अविनाश महातेकर,भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महायुती तर्फे २१ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आले.सरकारने या मागण्या मान्य न केल्यास १ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महायुतीतर्फे सरकारला देण्यात आला होता.
सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने महायुतीच्या घटक पक्षांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.हे आंदोलन संपूर्णपणे अहिंसक पद्धतीने असेल, असेही महायुतीतर्फे स्पष्ट करण्यात आले.केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केली नसताना चुकीची माहिती पसरवून केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही आ.ठाकूर यांनी सांगितले.
आ. ठाकूर म्हणाले की,लॉकडाऊन मध्ये मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबल्याने दुधाचे भाव १६, १७ रुपये पर्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने २५ रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र ठराविक दूध संघांकडूनच शासनाची दूध खरेदी केली जात आहे. परिणामी राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. अशा स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रूपये दर द्यावा, अशा मागण्यांसाठी भाजपातर्फे संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.