मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल लवकर मिळावेत यासाठी सिंधुदुर्गातील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी लॅबची सुरुवात होत आहे. या लॅबचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत रविवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी या भागाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला होता, त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी लॅबची आवश्यकता असल्याचे निर्दशनास आले. सिंधुदुर्गवासियांना कोरोनाच्या चाचणी अहवालासाठी गोवा अथवा पुणे येथे नमुने पाठवावे लागायचे, त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब व्हायचा. त्यामुळे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने यासंदर्भात आपल्यासह भाजपच्या आमदारांचा प्रत्येकी २० लाखांचा आमदार निधी स्वॅब लॅब च्या उभारणासाठी दिला होता. दरेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर आता ही लॅब सिंधुदुर्गमध्ये उभारली गेली आहे. या लॅबमुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना तपासणीचा अहवाल २४ तासात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची आता अहवालाची दीर्घकाळ करावी लागणारी प्रतीक्षा आता संपणार आहे.दरेकर आणि कोकणातील भाजपच्या आमदारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधुदुर्गवासीयांचा कोविड लॅब चा प्रश्न सुटला आहे.
या कोरोना चाचणी लॅबच्या उभारणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे आमदार रमेश पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून प्रत्येकी २० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याप्रसंगी आमदार नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार, राजन तेली उपस्थित राहणार आहेत.पनवेल येथे आधी कोरोना लॅब नव्हती पण विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी या भागाचा दौरा केल्यानांतर आणि आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदि यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पनवेल मध्ये कोरोना लॅब सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे रत्नागिरी येथे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी कोरोना परिस्थितीसाठी त्या भागाचा दौरा केला असता तिथे कोविड लॅबची कमतरता त्यांच्या ध्यानात आली. त्यांनतर दरेकर यांच्या प्रशासनवरील दबावामुळे रत्नागिरी येथे कोरोना लॅब उभारण्यात आली.