नाईक आत्महत्या प्रकरणी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचा फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई :आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रातील नेत्यासह फडणवीस सरकारवर प्रश्न चिन्ह निर्माण केले असतानाच आता या प्रकरणी काँग्रेसने थेट तत्कालीन फडणवीस सरकारवर हल्लाबोल करीत संशयाच्या फे-यात ओढले असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यावरून राज्य सरकार आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप झाले असतानाच आता आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या  आत्महत्या प्रकरणी शिवसेना आणि काँग्रेसने मागील फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीचा आधार घेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोट मध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतानाच केंद्र व तत्कालीन सरकारमधील कोणत्या नेत्याने त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असा सवाल करीत याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.या मागणीच्या निमित्ताने सरनाईक यांनी मागील सरकार मध्ये गृहखाते असणा-या फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या या मागणी नंतर काँग्रेसनेही आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज ट्विटच्या माध्यमातून भाजपला काही सवाल केले आहेत.अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतसिंहने कसलीही  सुसाईड नोट लिहून ठेवली नसतानाही सर्वांची चौकशी होत आहे.मात्र आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामीचा उल्लेखच केला नव्हता तर दोषी ठरवले होते. मग अर्नबला साधं चौकशीलाही फडणवीस सरकारने बोलावलं नाही.सरकार अर्णबला का वाचवत होते ? तेव्हा सीबीआय भाजपाला का आठवली नाही ? असा सवाल उपस्थित करीत सावंत यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी थेट फडणवीस आणि भाजपला संशयाच्या फे-यात ओढले असल्याने आता या प्रकरणी भाजप विरूद्ध शिवसेना काँग्रेस असा सामना रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

Previous articleभाजप आमदारांच्या निधीतून सिंधुदुर्गात सुरू होणार कोरोना चाचणी लॅब
Next articleअमृताताई…तुमच्या “फडणवीस” घराण्यातील कोणी आहे का पोलिस खात्यात ?