मुख्यमंत्री करायचे होते तर रावते,शिंदे आणि देसाई होते,पण मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचे होते !

मुंबई नगरी टीम

नागपूर । भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही महाराष्ट्रात बंगालप्रमाणे हिंसा होऊ देणार नाही. महाराष्ट्र पेटविण्याचे तुमचे कितीही मनसुबे असले तरी आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असे सांगतानाच,शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते,तर दिवाकर रावते,सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते.पण,मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की,आधी म्हणायचे मी पुन्हा येईन,आता म्हणतात मी गेलोच नाही,मी गेलोच नाही.सत्ता येते आणि जाते पण ती डोक्यात जाता कामा नये. अहंकार असता कामा नये. शिवसेनेला दिलेले वचन पाळले असते तर सत्ता गेली नसती. आज तुम्ही मुख्यमंत्री असता किं वा नंतर मुख्यमंत्री झाला असता.शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवून कदचित मीही राजकारणातून बाजूला झालो असतो.केवळ जबाबदारीच्या भावनेने मी राजकारण आणि मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे.शिवसेना प्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचे दिलेले वचन मी पाळले.मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणाचा समाचार विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतला.त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे वाईट नाही. पण, त्याला तत्वज्ञानाचा मुलामा लावणे आतातरी बंद करा.शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते,तर दिवाकर रावते, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते.पण,मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते,असेही फडणवीस म्हणाले

महाराष्ट्रातील लोकांनी बंगालप्रमाणे धडे घ्यावेत,असे आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. आपल्याविरुद्ध आवाज निघाला की, त्याचे मुंडके छाटायचे, त्याचे हातपाय तोडायचे, हे बंगालच्या राजकारणाचे मॉडेल आहे. तुम्ही असा प्रयत्न येथे कितीही केला तरी आमचा कार्यकर्ता महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पूर्वी विजयादशमी उत्सवांमध्ये विचारांचे सोने लुटले जायचे. पण, काल केवळ गरळ ओकताना ते दिसले. त्यांना कदाचित विस्मरण झाले असेल की जनतेने भाजपाला नाकारलेले नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले आणि शिवसेनेला वरपास केले. भाजपाने लढविलेल्या ७० टक्के जागा जिंकल्या आहेत. हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी बाभडेपणाचा मुखवटा आता तरी उतरविला पाहिजे.हे इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे.१ हजार कोटींचे दलालीचे रॅकेट या सरकारमध्ये उघडकीस आले आहे.काही मंत्र्यांनी तर फॉलोअपसाठी वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्टाचाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असा खळबळजनक आरोप सुद्धा त्यांना केला. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर कदापिही मान्य नाही. तो झाला असता तर आज अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये राहिले असते. मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले पाहिजे की, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? ड्रग्ज पुरविणारे,ड्रग्ज वापरणारे की त्याविरुद्ध कारवाई करणारे ?, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

संघराज्य बदलण्याची भाषा हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा छुपा अजेंडा कम्युनिस्टांना सोबत घेऊन तुम्ही रचताय.पण, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा अजेंडा सुद्धा यशस्वी होऊ देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.हे लोक वारंवार म्हणतात की,सरकार पाडून दाखवा.ते जेव्हा पडेल तेव्हा कळणार सुद्धा नाही.सरकार पाडणे हे आमच्या अजेंड्यावर नाही.आमच्या अजेंड्यावर राज्यातील जनता आणि त्यांच्या समस्या आहेत.पण, तुम्ही आधी काम करून तर दाखवा,जनतेचे प्रश्न सोडून तर दाखवा,शेतक-यांशी संवाद करून दाखवा, शेतक-यांना भेटून तर दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले. ज्यांचा अर्धा पक्ष उप-यांच्या भरोशावर तयार झाला, त्यांनी आम्हाला सांगावे ? त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना उमेदवार दिले, असा टोलाही त्यांनी लगावला.

Previous articleवेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजा मुंडे
Next articleदेवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शरद पवार यांनी दिल्या कानपिचक्या