वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजा मुंडे

मुंबई नगरी टीम

पाटोदा । आई जशी मुलाची दृष्ट काढते तसा मी पदर तुमच्यावरुन ओवाळला.जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन,तुमच्याशिवाय कोण आहे माझं ? अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय पंकजा मुंडे यांनी आज दसरा मेळाव्यात भावनिक साद घातली. मराठा-ओबीसी आरक्षण, उसतोड कामगार, अतिवृष्टीबाधित शेतकरी, जिल्हयातील सत्ताधाऱ्यांची कारस्थानं, व्यसनमुक्तीचा नवा संकल्प अशा विविध चौफेर विषयांवर त्यांचे आजचे भाषण लक्षवेधी ठरले.

राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे गाजला. आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या,आज विजयादशमी आहे,दसरा आणि दसऱ्याची आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा ही कायम ठेवण्यासाठी या उन्हात घरची पुरणपोळी सोडून तुम्ही सर्वजण येथे उपस्थित झालात, मी तुमच्यासमोर नतमस्तक होते.तुमच्या या प्रेमापुढे माझी झोळी कमी पडली. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला मी हेलिकॉप्टरमधून फुलं टाकत नव्हते तर भगवानबाबा आणि तुमच्यावर फुलं टाकत होते.मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे.
हे अत्यंत पवित्र स्थान आहे. या स्थानावर उच्चार करायचा नाही असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा, प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा आणि जातीचा आपल्याला कधीही अपमान वाटला नाही पाहिजे, हे मला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं. सकाळी मी आरएसएसचा कार्यक्रम बघितला, संरसंघचालकांनी सांगितले की, भेदभाव नाही पाहिजे. मुंडे साहेबांनीही तेच सांगितलं
आज या मंचावर कोण नाहीये, सर्व जातीचे आहेत.

तुम मुझे कब तक रोकोगे

“तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाऐं, दिल में अरमान यहीं, कुछ कर जाये… सुरजसा तेज नहीं मुझमें, दीपकसा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझे कैसे टोकोगे, कैसे रोकोगे” अशा शायराना अंदाजात त्या म्हणाल्या,हा मेळावा होईल का नाही चर्चा होती. काही जण मेळावा नको म्हणाले कारण सत्ता नाही.कधी या मेळाव्याने सत्ता पाहिली ? मुंडे साहेब सत्तेत नसताना या मेळाव्याने लाखोची संख्या पाहिली, पण कसे राजासारखे राहिलात,आपली परंपरा आहे.कुणी म्हणे अतिवृष्टी आहे कुणी म्हणे कोरोना आहे, लोकांची मनस्थिती नाही.मी म्हटलं अशाच लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे.अधिकाऱ्यांनी विचारलं की लोक येणार, मी म्हटलं मला माहित नाही पण मी जाणार एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात, मला असं वाटतंय की माझ्यासमोर भगवान श्रीकृष्ण साक्षात आहेत.

त्यांनी मंत्रिपद किरायानं दिलं

आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं
आमचं म्हणणे आहे तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु पण आज राज्यात काय परिस्थिती आहे. स्त्रियांचे प्रश्न वाढलेत, रोज पेपर उघडला, टीव्ही लावली की बलात्काराच्या घटना दिसतात,काय चालंलय महाराष्ट्रात?
महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का? लोकांना वाटतंय मी घरात शांत बसले. ते लोक आज खूश असतील. पण माझा दौरा लिहून घ्या, मी आता १७ ते २०तारखेपर्यंत दिल्लीत आहे. त्यानंतर मी २३ ते २५ मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर १२ डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावागावात संवाद साधणार आहे, असं त्यांनी सांगितलं.माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी २४ तास उघडे आहेत. मंदिरापासून ते हॉस्पिटल्स स्वच्छ ठेवण्याचा संकल्प गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी करावा तसचं तरूणांनी व्यसनापासून दूर रहावं असे आवाहन त्यांनी केले.

मराठा-ओबीसी आरक्षण

जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल यावर आज उठवणार आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं कारस्थान सुरु आहे. मराठा समाज शिक्षणाचं आरक्षण मागतो, ओबीसी समाज राजकीय आरक्षण मागतो, दोघांची भांडणं नाहीत, दोघं मिळूनच बहुजन समाज आहे. आणि या बहुजन समाजाची वज्रमुठ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी जो दौरा करणार आहे, त्या दौऱ्यात मराठा समाज, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि मजूर, महिलांची सुरक्षा हे घेऊन मी दौरा करणार असल्याचं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

महादेव जानकर काय म्हणाले

मेळाव्यात रासपचे नेते महादेव जानकर यांनीही तडाखेबंद भाषण केलं. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते. ब्राह्मणांचेही नव्हते आणि मुस्लिमांचेही नव्हते. भगवानबाबा सर्वांचेच होते. भगवान बाबांना जात नव्हती. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस, पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे, असं सांगून जानकर पंकजाताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभं रहावं असं आवाहन केलं.

खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केले आवाहन
———–
आज दसऱ्याचा दिवस आहे. नवरात्रीचा सण हा देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचे अनेक रुप बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायावी, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलंय. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही. याचंसुद्धा हा विजयादशमीचा सण प्रतिक आहे. त्यामुळे मी आज सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतेय.आज इथे आलेला प्रत्येक माणूस मनामध्ये अपेक्षा घेऊन आला आहे. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. कारण मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाही. तर इथे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला, मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आज मंचावर उपस्थित राहिलेले मान्यवर, सकाळपासून आलेले तुम्ही सर्व मुंडे परिवाराचा भाग आहात. आपला मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही. तर हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. इथे आल्यानंतर ऊर्जा मिळते.

क्षणचित्रं

• दुपारी १.४५ वा. पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरने सावरगांव घाट येथे आगमन
• स्वागतासाठी प्रचंड तोबा गर्दी ; ऊसतोड कामगारांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक
• व्यासपीठावर येण्यापूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे पूजन व आरती
• खा. डाॅ. प्रितम मुंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खा. सुजय विखे, शिवाजीराव कर्डीले, आ. मोनिका राजळे, आ. नमिता, मुंदडा, आ. मेघना बोर्डीकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, राधाताई सानप, राजेंद्र मस्के आदींची उपस्थिती
• प्रचंड उन्हातही दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपर्‍यातून अलोट गर्दी ; भगवान बाबा, मुंडे साहेबांचे फोटो आणि भगव्या पताकांनी सर्वांचे लक्ष वेधले.
• खा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्या गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड या रॅलीचे सर्वत्र जोरदार स्वागत

Previous articleसत्तेत आहेत की विरोधात ‘त्या’ गोंधळल्यात का ? – धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला
Next articleमुख्यमंत्री करायचे होते तर रावते,शिंदे आणि देसाई होते,पण मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचे होते !