सत्तेत आहेत की विरोधात ‘त्या’ गोंधळल्यात का ? – धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला

मुंबई नगरी टीम

परळी | सत्ताधारी म्हणतात की सरकार टिकेल तर विरोधी पक्षातले नेते रोज सरकार पडणार असल्याचे दावे करतात, हे थांबवले पाहिजे असा सल्ला आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून दिला होता. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, ताई स्वतः पण त्याच विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत व त्या त्यांच्या पक्षातील नेत्यांशी विसंगत बोलतात व सल्ले देतात, त्या गोंधळल्या तर नाहीत ना ? असा मिश्किल सवाल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विचारला आहे .

ऊसतोड कामगार महामंडळासाठी आमच्या सत्ता काळात मला हवं तसं काम करता आलं नाही, आता कामगारांची नोंदणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. पण सत्ताकाळात काही करता आले नाही असे म्हणून पंकजा मुंडे यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबुलीच दिली आहे. त्यावेळी तुमचे तीन-तीन खात्याचे मंत्रिपद कुणाला भाड्याने दिले होते? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

आम्ही मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केल्यापासून सातत्याने राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत व आता त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे, त्यामुळे आम्ही अ कल्याणकारी आहोत का कल्याणकारी आहोत हे येणाऱ्या काळात जनता ठरवेल असेही मुंडे एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले.दरम्यान आज झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी व्यसनमुक्ती बाबत जाहीर केले, यावर प्रतिक्रिया विचारली असता, धनंजय मुंडे यांनी व्यसनमुक्ती हा माझ्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येतो; या सत्कार्यासाठी त्या योगदान देणार असतील तर त्यांचे स्वागत व आभार मानतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आज दसऱ्याच्या दिवशी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यास वापरायची मान्यता दिल्याने याचा फायदा बीडसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांना होणार आहे. पाण्यावाचून थांबलेल्या विविध प्रकल्पाच्या कामातील पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व अन्य अडथळे या निर्णयाद्वारे दूर होणार असून याबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानतो असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

मुंडे यांनी आज दसर्‍याच्या मुहूर्तावर माहूर येथील रेणुका मातेचे सपत्नीक दर्शन घेतले . माहूर हे मुंडे कुटुंबीयांचे कुलदैवत असून प्रत्येक वर्षी ते दसऱ्याच्या दिवशी माहूर येथे दर्शनासाठी जातात आजही त्यांनी माहूर येथे दर्शन घेतले व अतिवृष्टी मुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर करण्याचे बळ मिळो, कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर होवो अशी प्रार्थना केली.तद्नंतर परळी येथे परतल्यानंतर धनंजय मुंडे गोपीनाथगड येथे जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी देखील नतमस्तक झाले.

Previous articleदस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पोलिसांना ‘गुड न्यूज’
Next articleवेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजा मुंडे