मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार विरोधकांकडून लक्ष्य केले जाहे.अशातच आता महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देखील विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणी उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार निलेश राणेंनी केला आहे.
निलेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रिम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले…की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे”, असे त्यांनी म्हटले. त्यासोबतच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात असून यात आदित्य ठाकरेंचा संबध असल्याच्या अनेक चर्चा सोशल मिडियावर रंगल्या आहेत. तर, विरोधी पक्ष देखील हे प्रकरण आता उचलून धरत आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा करण्यात आला आहे.दरम्यान त्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य यांचा सुशांतच्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.