मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड केअर सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाच्या कंपनीला मिळवून दिल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी निशाण साधला आहे. महापौरांच्या मुलाच्या कंपनीची नोंद झालेल्या पत्त्यावरच आणखी काही संदिग्ध कंपन्यांची नोंद झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली असून,या सर्वांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्याचे सुपुत्र यांची किश म्हणजेच ‘किशोरी कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ वरळीच्या ज्या पत्त्यावर नोंदणीकृत झालेली आहे. त्या पत्त्यावर आणखी ८ संदिग्ध कंपन्यांच्या नोंदणी झाल्या आहेत. महापौरांच्या कंपनीला मुंबई महापालिकेचे कंत्राट मिळाले हे सिद्ध झाले आहे. मी राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. या सगळयांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला हवी”, असे किरीट सोमय्या म्हणाले.
याआधी मनसेने कोविड केअर सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आला होता. महापौरांनी पदाचा गैरवापर करत आपल्या मुलाच्या कंपनीला कोविड केअर सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. मात्र महापौर किशोर पेडणेकर यांच्याकडून मनसेच्या या आरोपाचे खंडन करण्यात आले. महापालिकेच्या कायदा व नियमाप्रमाणेच कंपनीला काम मिळाले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले होते. या मुद्द्यावरुनच आता किरीट सोमय्या यांनी महापौरांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.