मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना रामावत आणि शिवसेना यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. मात्र या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने देखील हस्तक्षेप करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम असून मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी तयार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी ठणकावले आहे. भाजप महिला आयोगाला हाताशी धरून अटकेचा खेळ रचत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला आहे.
मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्कारलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसाचे रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही”, असे ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केले आहे. “भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करण्याचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे”, अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कंगनाने मुंबई आणि इथल्या पोलिसांबाबत वादग्रस्त विधान करत त्यांचा अपमान केला आहे. ज्यावर शिवसैनिक आता पेटून उठले आहेत. कंगनाच्या विधानावर भाष्य करताना प्रताप सरनाईक म्हणाले होते की, “कंगनाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणा-या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणा-या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार” असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले होते. हाच मुद्दा उचलून धरत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांनी सरनाईक यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरूच असून राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
‘