मुंबई नगरी टीम
अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने विरोधकांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण न करण्याचा टोला विरोधकांना लगावला आहे. तर केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेले १० टक्के आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडे सोपवले. मात्र केवळ मराठा आरक्षणालाच स्थगिती दिल्याने रोहित पवारांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
आमदार रोहित पवार हे नेहमीच सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. यावेळी देखील त्यांनी ट्विटरवरून याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेले १० टक्के आरक्षण ही दोन्ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे सोपवले. पण तसे करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे”, असे रोहित पवार म्हणाले. सरकारही पूर्ण प्रयत्न करत असल्याचे मी पाहतोय. तसेच आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटनापीठाकडे पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल, असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये”, असे त्यांनी म्हटले.दरम्यान,आरक्षणाच्या स्थगितीवरून मराठा समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.याकरता मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने गुरुवारी अकोल्यात निदर्शने करण्यात आली होती. तर दुसरीकडे न्यायालयाच्या या निर्णयाचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर फोडले आहे. सुरुवातीपासूनच हे सरकार आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नव्हते, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.