भाजपाचा केवळ ८१३ ग्रामपंचायतीवर विजय

भाजपाचा केवळ ८१३ ग्रामपंचायतीवर विजय
कॅांग्रेसचा दावा
मुंबई दि.१० राज्यातील ३ हजार १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत १ हजार ६३ ग्रामपंचायतीवर कॅांग्रेसचा झेंडा फडकला असून, भाजपाला केवळ ८१३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आल्याने या निवडणूकीत जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले असताना भाजपकडून मात्र गिरे तो भी टांग उपर या नितीने बोगस आकड्यांचा प्रपोगंडा करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कॅांग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले असून या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष राहिलेला आहे. १६ जिल्ह्यातील ३ हजार १३१ ग्रामपंचायती पैकी १ हजार६३ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून भाजपाला केवळ ८१३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. त्याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने ८३४ तर शिवसेना व अपक्ष यांनी ४२१ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने त्यांच्या खोटं बोला पण रेटून बोला या परंपरेला साजेसं काम करीत काल विजयाचे खोटे आकडे माध्यमांसमोर मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याची टीका वाघमारे यांनी केली आहे.
या निवडणुकीतही भाजपकडून सत्ता व पैशाचा वापर करण्यात आला परंतु या दोन्ही गोष्टी भाजपकडे असतानाही भाजपाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. पक्षाचे हे अपयश झाकण्यासाठी भाजप नेत्यांकडून खोटे आकडेवारी माध्यमांसमोर मांडून जनता आपल्या सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अशा खोट्या आकडेवारीमुळे जनतेवर याचा परिणाम होणार नाही. जनतेने भाजपाचा खोटेपणा ओळखला असून भाजपचा आता काऊंट डाऊन सुरु झाले आहे.काँग्रेस पक्ष, ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विजयाची हीच परंपरा कायम राखून पुढे होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही बाजी मारेल असा असा विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला.

Previous article
Next articleनांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी आज मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here