मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही. आम्ही सगळी मराठी माणसे, मराठी नेते, मराठी मने एकत्र आहोत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात असताना संजय राऊत यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.
मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून जे वातावरण मुंबईच्या बाबतीत तयार झाले आहे. मुंबईतील आर्थिक, राजकीय,औद्योगिक अशा प्रमुख संस्था शहराबाहेर नेल्या जात आहेत. मुंबईचे महत्त्व कमी केले जात आहे. मुंबईचे पंख कापले जात असून शहराची आर्थिक ताकद कमी केली जात आहे, असे मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले. अभिनेत्री कंगना राणावतच्या अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाई विषयी देखील संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. मुंबईत राहायचे, मुंबईला पाकिस्तान म्हणायचे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करायचा आणि स्वतः बेकायदेशीर महालात राहायचे, अशी टीका राऊत यांनी केली. तर, महापालिका स्वायत्ता संस्था असून त्यांना काही अधिकार आहेत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी राज्यातील इतर प्रश्नांवरदेखील भाष्य केले. सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रात हे संकट अधिक आहे. तर वर्षभर तरी हे संकट दूर होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ढासळलेली असून केंद्र सरकार मदत करायला तयार नाही. बेरोजगारीचा प्रश्न देखील आहे. त्यामुळे हा प्रश्न पुढील अराजकतेला जन्म देईल, अशी भिती संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.