राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्यांचा रोहित पवारांनी घेतला खरपूस समाचार

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणाचीही त्यात भर पडली आहे.अशा परिस्थिती महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी केली होती.पासवान यांच्या या मागणीचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.तर आपले विरोधी पक्षनेते देखील बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा,अशी मागणी करत असल्याची टीका रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्राची बदनामी करून राजकारण करत असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत भाष्य केले आहे. विरोधकांनी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या झाडण्याचे काम बंद करावे. त्यांचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कधीच यशस्वी होणार नाही, अशा शब्दांत रोहित पवारांनी भाजपला खडसावले आहे. यावर अधिक बोलताना रोहित पवार म्हणाले. “धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झाले. आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार, खूनासारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत. सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशावेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपले महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभे राहणार सरकार आहे. मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याचे वाटते की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठराविक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण, माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात असल्याचे दिसत आहे. परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे.पिडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचे काम विरोधकांनी बंद करावे. महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही.”

Previous articleकोरोनावर लस येत नाही तोवर निष्काळजीपणा नको : पंतप्रधान मोदी
Next articleशिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची : संजय राऊत