हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा ;उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येवून एक वर्ष पुर्ण होत आहे.मुख्यमंत्री म्हणून मी कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल,असे स्वप्न बघत आहेत. असे सांगतानच,हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे.दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली.

कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेचा दरवर्षी होणार दसरा मेळावा या वर्षी शिवाजी पार्कात न होता काही निवडकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून,राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व होते.आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.शिवाय नारायण राणे,भाजपा, रावसाहेब दानवे,राज्यपालांवर शरसंधान साधले.या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आले आहे.मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेक जण सरकार पडेल,अशी स्वप्न बघत आहेत.त्यानुसार तारीख पे तारीख देत आहे असे सांगतानाच, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हान देतानाच, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुगळे नाहीत. पण जर वाटेल जाल तर मुगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशा इशाराही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

मी वाघाची औलाद आहे,असे सांगतानाच,त्याला जर डिवचले तर काय होते.त्याचे इतिहासात दाखले आहे आणि भविष्यातही पाहायला मिळतील, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला वाघ पाहून तो लपला अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाव न घेता राणे पिता पुत्रावर केली.आपल्या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावरही निशाणा साधला.घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचे हिंदुत्व असा सवाल करतानाच,आमचे हिंदुत्व असले नाही,हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व असेही मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले.कोरोनाचे संकट असतनाही सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय ? असा सवाल करून पक्षावर आणि देशावरही थोडं लक्ष द्या असा टोला त्यांनी भाजपला लगवाला.

देश रसातळाला चालला आहे असे सांगून,देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही असे सांगतानाच, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.जीएसटीच्या परताव्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खरपूर समाचार घेतला.जीएसटीच्या परताव्यावरून  दानवे यांनी राज्य सरकावर टीका केली होती, लग्न तुम्ही केले आणि पैसे बापाकडे मागता ? अशा शब्दात टीका करणा-या दानवेंचा समाचार यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. दानवेजी बाप तुमचा असेल,माझा बाप इकडे आहे.माझ्यासोबत आहे.मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत.लग्न आम्ही केलं.पण लग्न करताना बाप तर सोडाच, आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो सुद्धा आहेर घेऊन पळालेला आहे.अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी दानवे यांच्यावर टीकेची तोफ डागली.

माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही असे सांगतानाच आज महिलांवर अत्याचार होत आहेत, हत्या होत आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का केला नाही ? इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यपालांचाही समाचार घेतला.हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत.का तर मंदिरे उघडले नाहीत म्हणून.पण आम्हाला कोण विचारतय असा सवाल उपस्थित करीत ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते अशा शब्दात त्यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.कदाचित त्या वेळेला ज्यांचे नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हते ते आम्हाला विचारताहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले ? तुम्ही अचानक सेक्युलर झालात ? असेही ते म्हणाले.

आपल्या  भाषणात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिनेत्री  कंगना रानावतचे नाव न घेता समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत महाराष्ट्रात यायचे आणि नंतर दाखवायचे की आम्ही कष्ट केले. मुंबई, महाराष्ट्राचे मीठ खायचे आणि नमक हरामी करायची ही असली रावणी औलाद, महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची. महाराष्ट्रात पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बिहार निवडणुकीवरून भाजपला लक्ष्य केले. बिहार विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

Previous article“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”: पंकजाताईंचा पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण