मुंबई नगरी टीम
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलांसंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला राज ठाकरेंना दिला. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत.उद्धव ठाकरे फिरतच नाही.म्हणून राज्यपालांनी तसे सांगितले असावे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
चंद्रकांत पाटील हे आज सांगली दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्या भेटीतील याच मुद्दयावरून चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, राज्यपालांनी काय सांगितले हे मला माहित नाही. ते कोणत्या हेतून बोलत होते हेही मला माहित नाही. पण मला विचाराला तर सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग आहे? एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर शरद पवारांना भेटावे लागते. कारण मुख्यमंत्री ना प्रवास करतात ना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांचे म्हणणे एकतात. तर मी खुर्चीत बसतो तुम्ही सत्ता चालवण्याचे कंत्राट घ्या, असे उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना सांगितले असेल. तसा त्यांचात करार झाला असेल, अशी बोचरी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचे अशी लोकांची भावना झाली आहे व ही वस्तुस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच आपण अनेकदा उद्धव ठाकरेंना राज्यातील प्रश्नांबाबत पत्र लिहली. पण त्यांनी आपल्या एकही पत्राला उत्तर दिले नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. आजघडीला विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही तर निर्णयांची कमतरता आहे. तर सरकार कुंथत कुंथत चालत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.