दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रालयातून परत माघारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी त्यांनी मंत्रालयात हजेरी लावली होती.मात्र तत्पूर्वी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना समजले व ते आल्या पावलीच माघारी फिरले. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरून दिली आहे.

“नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन”, असे ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. एकापाठोपाठ एक राज्यातील मंत्र्यांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अजित पवार यांची प्रकृती चांगली असून त्यांना कोणताही त्रास होत नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर देवेंद्र फडणवीस यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रेमडीडिसिव्हीरचा डोस देण्यात आला आहे. त्यांच्यावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.ठाकरे सरकार मधील एकूण १८ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १६ मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे.तर सध्या उपमुख्यमंत्री पवार आणि कामगारमंत्री वळसे पाटील हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Previous articleशरद पवारच राज्य चालवतात;उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग ?
Next article“मानलं पवार साहेब आपल्याला…” निलेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचले