“मानलं पवार साहेब आपल्याला…” निलेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

मुंबई नगरी टीम

मुंबई : स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचे वाक्य गेल्या ३० वर्षांपासून ऐकतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. पवारांनी शिवसेनेला काढलेल्या या चिमट्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

निलेश राणे यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या बातमीचा आधार घेत ट्वीट केले आहे. “मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यता कान टोचले व कानपटीत पण दिली”, असा खोचक टोला निलेश यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसऱ्या मेळावाच्या भाषणात भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लबोल चढवला. तर आता निलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसोबत व्हीसीद्वारे बैठक पार पडली होती. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशाचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

Previous articleदिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रालयातून परत माघारी
Next articleसरकार शरद पवार नव्हे, उद्धव ठाकरेच चालवतात : उदय सामंत