मुंबई नगरी टीम
पुणे : “शरद पवारांचा सल्ला घेतात ही आनंदाची गोष्ट आहे. शरद पवार महाराष्ट्र चालवतात, उद्धव ठाकरे नाही हे त्यांनी मान्यच केले. मग ते आता पवारांचा सल्ला घेऊ देत किंवा पार्थ पवारांचा”, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत देखील आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषद घेताना त्यांनी विरोधक आणि राज्यपालांवर निशाणा साधला. यावर चंद्रकांत पाटलांनी आता उत्तर दिले आहे.
राज्यपालांनी मनसे अध्यक्ष ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता. यावर बोलताना शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होते?, असा सवाल संजय राऊतांनाही केला. यावर शरद पवार हे महाराष्ट्र चालवतात, उद्धव ठाकरे नाही हे त्यांनी मान्यच केले असल्याचे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. भाजपवर टीका करणे हे संजय राऊतांचे कर्तव्य आहे ते त्यांनी बजावले पाहिजे. त्यामुळे तर त्यांची पक्षात आहे ती जागा आहे, असा बोचरा टोमणाही त्यांनी मारला.
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार, असे संजय राऊतांनाही ठामपणे म्हटले होते. यावरही बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही पाच वर्षाचे सरकार चालवले तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे. हिंमत असेल तर तिन्ही पक्षांनी वेगवेगळे लढा,असे जाहीर आव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला केले आहे. मात्र तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्त्वे वेगळी आणि एकत्र लढता, आम्हाला काही फरक पडत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज्य सरकार सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकत आहे. पण राज्य सरकार राज्यातील फेरीवाले,रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही, असा सवाल भाजपचे पाटील यांनी केला.कोरोनाच्या काळात रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. केंद्राने नोव्हेंबर पर्यंत रेशन दुकानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिले. याशिवाय फेरीवाले आणि लघु उद्योगांना कर्ज योजना असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पण राज्य सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही. राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला यांना मदतीसाठी आर्थिक पॅकेज केव्हा जाहीर करणार,” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.