उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर शिवसेनेकडून ‘या’ अभिनेत्याचे नाव चर्चेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यात आता आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. उर्मिला यांच्या उमेदवारीमुळे भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तर आता शरद पोंक्षे यांच्या उमेदवारीवरून कोणत्या टीका टिप्पण्या विरोधी पक्ष करतात हे पाहावे लागले.

हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप नेहेमीच शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला तोडीस तोड म्हणून शिवसेनेकडून शरद पोंक्षे हे नाव दिले जाणार अशी चर्चा आहे. मात्र शिवसेनेसोबत सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना शरद पोंक्षे यांचे नाव चालणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तसाठी राज्यपाल कडक नियम लावणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारकडून विचारपूर्वक सदस्यांची नावे दिली जाणार आहेत. दरम्यान, या संदर्भात अदयाप आपल्याला विचारणा झाली नसल्याची माहिती शरद पोंक्षे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

शरद पोंक्षे यांच्या विधान परिषदेवरील उमेदवारीवर आरपीआयने विरोध दर्शवला आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवसेनेने शरद पोंक्षे यांची निवड करू नये, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे विधान शरद पोंक्षे यांनी मध्यंतरी केले होते. याला विरोध दर्शवत महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी खरात यांनी केली आहे.

Previous articleशेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद : काँग्रेस
Next articleतेव्हाचे मुख्यमंत्री मला पंतप्रधान कार्यालयात घेवून गेले होते : केसरकरांचा गौप्यस्फोट