मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात कायद्याने काम चालते. जर आमच्याकडून काही चुकले असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही,असे शिवसेना खासदर संजय राऊत यांनी म्हटले आहे.वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज पनवेल पोलिसांनी अटक केली.यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आपल्याला या अटकेबद्दल माहीत नसल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्राचे आणि मुंबईचे पोलीस कधीही सुडाने कारवाई करत नाही. ही कारवाई पोलिसांनी केली असून त्याचा सरकारशी काही संबंध नाही,असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राज्यातील भाजपचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.माध्यमांची ही गळचेपी असून सरकार दडपशाही करत असल्याची टीका भाजपचे नेते करत आहेत.यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. इथे कायद्याने काम चालते. जर आमच्याकडून काही चुकले असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीही कोणावर अन्याय करत नाहीत, सुडाने कारवाई करत नाही. या संदर्भात पोलिसांच्या हाती काही पुरावे, धागेदोरे सापडले असतील. ही कारवाई पोलिसांनी केली आहे. याचा सरकारशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असण्याचे कारण नाही”.
संबंधित चॅनेलने आम्हा सर्वांच्या विरोधात बदनामीचे कॅम्पेन चालवले होते. खोटे आरोप लावले होते. या खोट्या आरोपांची देखील चौकशी व्हावी, असे आम्ही म्हटल्याचे संजय राऊतांनी सांगितले. अर्णबला अटक झाल्याने हा पत्रकारितेतील काळा दिवस असल्याचेही बोलले जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मला वाटत नाही हा काळा दिवस आहे. पत्रकारांनी सुद्धा आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तर सर्वोच्च न्यायालयाने देखील रिपब्लिक चॅनेलबद्दल जे निरीक्षण नोंदवले आहे ते देखील महत्त्वापूर्ण असल्याची आठवण यावेळी संजय राऊत यांनी करून दिली.