कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अर्णबच्या अटकेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील,असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.अलिबाग पोलिसांनी आज सकाळी ही कारवाई केली आहे.पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ही केस बंद झाली होती. मात्र अन्वय नाईक यांच्या पत्नीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी न्यायालयाने दिली असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे अनेक नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर चक्क केंद्रीय मंत्र्यांनी देखील अर्णबच्या अटकेवरून ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली असे म्हणत अमित शहा यांनी पत्रकारितेवरील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Previous articleसरकारशी याचा काही संबंध नाही, अर्णब गोस्वामीच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Next articleअर्णबची पाठराखण केल्याने देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार